पहिलेच सांगते की माझा काही साबूदाणा खिचडी, राजगीरा शिरा, भगरची खिचडी आणि असेच बरेचसे खास उपवासाला केले जाणारे पदार्थ यथेच्छ हाडडून वर संध्याकाळी काय करणार ग मम्मि? अश्या प्रकारच्या उपवासावर विश्वास नाही..
नाही नाही... म्हणजे तुम्ही समजला तसा मी हे पदार्थ खात बित नाही असं काही नाही... उलट पक्षी मीही त्यावर ताव मारायचा माझया परीने प्रयत्न करते... पण खायचच आहे तर पोटा ला मानवेल असं खावं.. (ह्म्म्म्म.... उगाच दिसतय ते तब्येत बघून.. वगैरे टोमणे मारण्याची गरज नाही.. अशांकडे साफ दुर्लक्ष करण्यात येईल.. तसाहि माझा शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ यावर जास्त विश्वास आहे....) उगाच माझा उपास आहे हां.. असं सांगता सांगता तोंडात एक साबूदाणा वडा कोंबन म्हणजे मला रोजच्या भाजी पोळी ला उगाच दगा दिल्यासारखा वाटत.. ते देवहि वरतुन अरे बस कर की राव आता... किती खाशील एका दिवशी... असं काळजीने विचारत असतील.. (असे लोक म्हणजे "एकादशी आणी दुप्पट खाशी" हा मंत्र जपण्यासाठीच एकादशी असते.. आणि तो जपण्याची जबबदारी आपलीच आहे असे समजून ती कसोशीने पार पाडण्याचा प्रयत्न करत असतात.. काय म्हणता तुम्ही ही याच गटात मोडता? हावरट कुठले... तसे या मंत्रावर एक प्रसिद्ध असा शालेय जोक पण हाये.. शहाण्या लोकांना लगेच आठवेल... मला काही तो एवढा आवडायचा नाही.. (जोक हो..) पण प्रत्येक एकादशीला तो जॉक मारायचा आणी हसायचं असंही ठरलेलच असायचं... तसं शाळेत दात दाखवायला काहीही कारण चालायचं... असो.. ) म्हणजे निरांकार उपास वगेरे गोष्टी कितीही भारी, सात्विक, पावरफुल वगैरे वाटत असल्या तरी आपल्याला नाही बुवा त्या(ही) जमत.. (उगाच कशाला शहाणपणाचा आव आणून एकादशीला खोटं बोला.. )
हं तर मी सांगत होते की, आज माझा उपास मुगाची खिचडी उरली असल्याने फोडनीची खिचडी त्यानंतर साबूदाणा खिचडी असा सुरू झाला.. आता ती मुगाची खिचडी गायीला देऊन तिचा उपास का मोडा? (इति मातोश्री) (हो आमच्याकडे देवाला, गायीला सुद्धा उपास करायला लावतात.. ) पण आम्हाला मात्र आमच्या मातोश्री आपल्या परीने वागू देतात.. (कंटाळून असावे..)
त्यामुळे ती खिचडी पण माझया वाट्याला आली.. आणि उपास करण्या आधीच मी उपास मोडला...
तसे मधे मधे चरत राहण्याची सवय असल्याने पोट भरलेलेच होते.. त्यामुळे एकादशी वगैरे आहे ही गोष्ट मी तशी विसरुनच गेली होती... {तसंही आजकाल रिकमटेकडी (हा शब्द दुसर्याकोणि माझया साठी वापरलेला मुळीच आवडत नाही मला.. अश्यांचा वयानुसार योग्य तो समाचार घेण्यात येतो... )असल्याने माझा आणी तारखा, वार वगैरेंचा काही संबंध येत नाही.. फक्त महिन्याचा पुर्वार्ध आणी उत्तरार्ध याची दाखल घेण्यात येते.. (हे असे का हे नंतर कधीतरी.. ) आणी रिकामटेकडी यासाठी की सध्या माझी स्थिती म्हणजे सुशिक्षित रोजगार कम बेरोजगार असा आहे... (हो असाही एक वर्ग अस्तित्वात असतो.. ) हा विषय इथेच संपवते नाहीतर माझया तोंडून काही !@%|\ बाहेर पडेल... कंस बराच वाढला नाही का? भावना आवारा..}
संध्याकाळी काही विशेष (चरायचे) काम नसल्याने वाईच भटकुन येऊ असा विचार करून मी आणि मम्मी फिरायला बाहेर पड्लो.. जाताना जवळच्याच देवळात कीर्तन सुरू होतं.. आता कीर्तनचं आणि माझ तसं काइ वाईट नाई.. पण ते ऐकायला जाउन काय बसावं, तसंही ते कानावर पडतंच की असा विचार मी मम्म्याला (हे मम्मी या एकाच व्यक्तिचं निराळं रूप आहे.. ते मूड परत्वे बदलतं याची वाचकांनी नोंद घ्यावी ) बोलून दाखवला.. पण एकादशीचा एवढा चांगला योग जुळून आलाच आहे.. तर असा सोडणं बरं दिसत नाही असं म्हणून ती जाऊन बसली सुद्धा.. आता 5 मिनिटात आवर हं.. अशी तंबी देऊन मीही तिथे बसले.. आणि मग लक्षात आलं, अरे इथे तर छान टाळ, तबला, पेटी सह सगळं ठेक्यात सुरु आहे.. आता तबला ऐकायला मला भारी आवडतं.. ती तबल्यावर फिरणारी बोटं आणि त्या बोटातून जादू व्हावी असे निघणारे ते ठोके... अहाहा (या अहाहा ऐवजी वाह ताज असं का म्हणावस वाटलं मला?? लहानपणी ती ज़ाकिर हुसेन ची जाहिरात पाहिल्यानंतर मला तबल्याला वाह ताज अशी दाद देतात असंच वाटायचं किती तरी दिवस... ) त्या तबला वाजवत असलेल्या मुलाचा उगाच हेवा वाटून गेला.. आता बुवानी गोष्ट सांगायला सुरूवात केली तसे सगळे वाद्य थांबले..
तीच ती शबरीच्या बोरांची गोष्ट कित्तीदा ऐकलेली पण मधेच वाक्य संपताना दिलेला तबल्याचा ठेका, पेटीचे सूर, आणि टाळ याने त्या गोष्टीत मी रंगून गेले.. मला उगाच कीर्तन म्हंजे म्हातार्या लोकांचं काम असं इतके दिवस वाटतं होतं..
बिचारी मम्मी चलायचं का म्हणून विचारायला लागली तेव्हा अगं थांब ना ऐकू की जरा असं मी म्हटल्यावर थोडं आश्चर्याने बघायला लागली..
सर्व संपल्यावर घरी येतानाही तो आवाज किती तरी वेळ कानात भरून राहिला..
किती दिवसानी असं शांत चित्ताने बसून ऐकत होते मी.. नाहीतर नेहमी धावपळ, गडबडीत कामे करण्याची सवय लागल्यामुळे असं शांत बसलं की उगीच चुकचुकल्यासारखं वाटत राहातं... काय हरकत आहे एक दिवस त्या मोबल्या कडे नाही पहिलं तर?
नाही गेलो एक दिवस ऑनलाइन तर? हे माझच मला विचारायला लागेल.. तसे मी छोटे छोटे प्रयोग करून पहिलेय या बाबतीत छान वाटतं... (मला असलं काही भलत सलत करून स्वतःच कौतिक करून घ्यायला आवडतं.. रिकामे उद्योग तुम्हाला काय.. ) तुम्हीही बघा की प्रयत्न करून...
ता. क. := मराठीत पहिल्यांदाच पोष्ट्त असल्याने टायपताना बर्याच चुका झालेल्या आहेत.. तरी चूक भूल देणे घेणे...